पिंपरी-चिंचवड: कु. दुर्गा अभय भोर, अध्यक्षा, दुर्गा ब्रिगेड संघटना महाराष्ट्र राज्य आणि पिंपरी चिंचवड महिला उद्योजक संघटना, यांच्या वाढदिवसानिमित्त ‘दुर्गा अभियान’ अंतर्गत विविध समाजोपयोगी उपक्रमांचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले. या अभियानांतर्गत महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण, लघुउद्योग मार्गदर्शन आणि वृक्षारोपण असे महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आले, ज्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी महिलांसाठी विशेष स्वसंरक्षण प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यामध्ये महिलांना आत्मसंरक्षणाची तंत्रे शिकवून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यावर भर देण्यात आला. कुमारी अवंतिका भोर आणि मोहसिना शेख यांनी महिलांना स्वसंरक्षणाचे धडे दिले. तसेच, भोसरी स्पाईन रोड दामिनी पथकाच्या सरस्वती काळे आणि मोनिका वरपे यांनी महिलांच्या सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी लघुउद्योग मार्गदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते. उद्योजक संघटनेचे अध्यक्ष श्री. अभय भोर यांनी महिलांना उद्योजकतेविषयी माहिती आणि प्रेरणा दिली, ज्यामुळे त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत होईल.
पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने वृक्षारोपणाचा उपक्रम राबवून समाजात हरित संदेश पोहोचवण्यात आला. वाहतूक पोलीस वरिष्ठ निरीक्षक दीपक साळुंखे, इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर आणि अनेक महिला उद्योजकांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी कु. दुर्गा भोर यांच्या शुभहस्ते महिला कामगारांचा सन्मानही करण्यात आला. या कार्यक्रमाला बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांच्यासह अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने महिला व नागरिकांनी उपस्थिती लावली. या उपक्रमांमुळे महिलांच्या सक्षमीकरणाला चालना मिळून सामाजिक जाणीवा अधिक बळकट झाल्याचे दिसून आले.
