40
पिंपरी :- कंटेनरमधून अवैधरित्या रक्तचंदन वाहतूक करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीसह दोघांना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने नेरुळ, नवी मुंबई येथून अटक केली.
राजेंद्र विठ्ठल शिंदे (४३, रा. वाशी, नवी मुंबई) असे अटक केलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. तसेच, त्याच्यासोबत कल्पेश सिंग म्हणून खोटं नाव सांगणाऱ्या तौसिफ रियाज जमादार (रा. कोपरखैरणे) यालाही अटक करण्यात आली.
पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील एका कंटेनरमधून सुमारे ९ कोटींच्या रक्तचंदनासह दोन आरोपी पकडले होते. त्यांच्याविरुद्ध शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी एकूण ६ आरोपी अटकेत आहेत. राजेंद्र शिंदे व कल्पेश सिंग (उर्फ तौसिफ) याचा पोलिस शोध घेत होते.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त शशिकांत महायरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ व पथकातील स्टाफ यांनी केली आहे.