पिंपरी :- सिंगापूर येथील चायनीज व्यक्तीकडून तयार केलेल्या वेगवेगळ्या पाच लोन ॲपद्वारे फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी मुंबईतून एकाला अटक केली असून, त्याच्यांकडून मोबाईल, लॅपटॉप जप्त केले आहेत. संबंधित मोबाईल ॲपच्या माध्यमातून फसवणूक केल्याच्या देशभरात दहा हजारांहून अधिक तक्रारी दाखल आहेत. याप्रकरणी एका २९ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.
इसाकी राजन थेवर (वय २९) असे अटक केलेल्याचे नाव आहे. म्हाळुंगे येथे राहणाऱ्या एका महिलेला व्हॉट्स ॲपला क्रेडिट पाइलेट या नावाने लिंक आली. त्या लिंकद्वारे संबंधित सायबर चोरट्याने त्या महिलेच्या मोबाईचा ॲक्सेस मिळवला व त्याद्वारे लोन काढले. तसेच यासाठी महिलेस ऑनलाईन पैसे भरण्यास भाग पाडले. त्यानंतर पुन्हा १५ हजारांची मागणी केली. तसेच, ती रक्कम न भरल्याने मॉर्फ केलेले फोटो नातेवाईकांना पाठवलेले. संबंधित महिलेने याबाबत सायबर पोलिसांना कळवले. या प्रकरणाची तांत्रिक तपासणी केल्यानंतर हे ॲप्लिकेशन मुंबईतून चालवले जात असल्याचे आढळून आले. त्यानुसार सायबर पोलिसांनी थेवर याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता, त्याच्याकडे मोबाईल, ५ लॅपटॉप, ७ सीमकॉर्ड, २ डेबीट कार्ड आढळून आले. लॅपटॉपमध्ये वेगवेगळया प्रकाराचे पाच फ्रॉड ॲप असून, त्याद्वारे तो फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आले. या ॲपद्वारे फसवणूक केल्याच्या देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी १० हजार तक्रारी आल्या आहेत.
सदरची कारवाई सायबर सेलचे पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक पोलिस निरीक्षक प्रविण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक सागर पोमन, वैभव पाटील, प्रकाश कातकाडे, पोलीस उपनिरीक्षक विद्या पाटील, पोलीस अंमलदार अतुल लोखंडे, दिपक भोसले, हेमंत खरात, सुभाष पाटील, सचिन घाडगे, कृष्णा गवळी, श्रीकांत कबुले, नितेश बिच्चेवार, सोपान बोधवड, माधव आरोटे, स्वप्निल खणसे, वैशाली बर्गे, शुभांगी ढोबळे, दिपाली चव्हाण, भावीका प्रधान सर्व नेमणुक सायबर पोलीस ठाणे यांच्या पथकाने केली आहे.