चिंचवड (दि. ०८ डिसेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ग्रीन बॉण्ड्सद्वारे राबविण्यात येत असलेल्या ‘हरित सेतू’ प्रकल्पावर गंभीर आक्षेप नोंदवत पीएनएसकेएसचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. विजयकुमार पाटील यांनी महापालिकेवर निधीचा मूळ उद्देश बिघडवल्याचा आरोप केला आहे. रस्ते अरुंद करून आणि फूटपाथ मोठे करून वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने हा प्रकल्प शाश्वत विकासाच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. पाटील म्हणाले की, ग्रीन बॉण्ड्सचा हेतू पर्यावरणपूरक, प्रदूषण कमी करणारे, हरित जागा निर्माण करणारे आणि वाहतुकीचे शाश्वत उपाय देणारे प्रकल्प उभे करणे हा असतो. मात्र प्राधिकरण परिसरात सुरू असलेल्या कामांमुळे वाहतूक कोंडी वाढत असून भविष्यात हवेचे प्रदूषण, प्रवासाचा कालावधी आणि नागरिकांच्या जीवनमानावर परिणाम होणार आहे.
निधीचा वापर चुकीच्या पद्धतीने होत असल्यास महापालिकेची प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते. मोठ्या प्रमाणात सिमेंट वापरून कामे केली जात आहेत, जे हरित प्रकल्पांच्या परिभाषेत बसत नाही. रस्त्यांचे अरुंदीकरण करणे हा ग्रीन बॉण्ड्सच्या जागतिक मानकांसह सेबीने ठरवलेल्या चौकटींचाही भंग आहे. ग्रीन बॉण्ड्सद्वारे सार्वजनिक वाहतूक सुधारणा, इलेक्ट्रिक बस, सायकल ट्रॅक, हरित वृक्षारोपण, स्मार्ट पार्किंग यांसारखे उपाय अपेक्षित असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे. सेबीच्या २०१५ च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ग्रीन बॉण्ड्सचा निधी पारदर्शकपणे योग्य हरित प्रकल्पांत वापरला जाणे आवश्यक आहे. अहमदाबाद महापालिकेने २०२४ मध्ये शून्य द्रव स्त्राव, हरित ऊर्जा आणि सांडपाणी शुद्धीकरणासारख्या खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक प्रकल्पांसाठी ₹१०० कोटी उभारले होते, हे उदाहरण देत पाटील म्हणाले की पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही अशीच दृष्टिकोन अपेक्षित आहे.
“सध्याचा हरित सेतू प्रकल्प वाहतूक कोंडी व कार्बन उत्सर्जन वाढवणारा ठरत आहे. त्यामुळे शाश्वत उपाययोजना तातडीने राबविणे गरजेचे आहे,” अशी मागणी डॉ. पाटील यांनी केली.
– डॉ. विजयकुमार पाटील, अध्यक्ष, PNSKS महाराष्ट्र राज्य…