पिंपरी चिंचवड (दि. 14फेब्रुवारी 2026) :- देहू ते आळंदी मार्गावर जाधववाडी परिसरात बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हा अपघात ११ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ९.१५ वाजता मधुबन हॉटेलसमोर घडला. ट्रक चालकाने रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वेगात वाहन चालवत पुढे जाणाऱ्या पल्सर दुचाकीला पाठीमागून धडक दिली. धडकेनंतर दुचाकीस्वार खाली पडला आणि ट्रकचे चाक त्याच्या अंगावरून गेल्याने गंभीर दुखापत झाली.
या अपघातात अनिल पांडुरंग कांबळे (वय २५) यांचा डोक्याला, हाताला व पायाला गंभीर मार लागून मृत्यू झाला. ते फिर्यादी सुनिल पांडुरंग कांबळे (वय २९, रा. सोनवणे वस्ती, चिखली) यांचे भाऊ होते. सुनिल कांबळे यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर चालक फरार झाला असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास सपोफौ पारधी करीत आहेत.
दरम्यान, देहू-आळंदी मार्गावर वाढत्या वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची नागरिकांची तक्रार असून, वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे.
