पिंपरी चिंचवड :- पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर कामांबाबत सर्व सामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, पिंपरी चिंचवड शहर च्या वतीने वतीने गुरुवारी, सकाळी १० वाजता, “जागर मोर्चा”चे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती शिवसेना शहर प्रमुख चेतन पवार यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
चेतन पवार यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नाबाबत अनेकवेळा आयुक्त आणि संबंधित अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून अर्ज केले आहेत. परंतु भ्रष्टाचारात अखंड बुडालेल्या प्रशासनाला जाग येत नाही. शिक्षण मंडळ विभाग, भूमी जिंदगी विभाग, वैद्यकीय विभाग, बांधकाम विभाग, स्थापत्य विभाग, क्रीडा विभाग, आरोग्य, विद्यकीय व पर्यावरण विभाग आदी विभागातील भ्रष्टाचार आणि भोंगळ कारभाराबाबत शिवसेना आता रस्त्यावर उतरून नागरिकांमध्ये जनजागृती करणार आहे. गुरुवारी सकाळी १० वाजता हा “जागर मोर्चा” चिंचवड स्टेशन येथील हनुमान मंदिर, एम्पायर सोसायटी, येथून निघणार असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर धडकणार आहे.
शिवसेना शहरप्रमुख चेतन पवार यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या मोर्चा मध्ये शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक, सर्व शिवसैनिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन शहर प्रमुख चेतन पवार यांनी केले आहे.