Home पिंपरी चिंचवड भटके-विमुक्तांकडे अनेक उपनिषदे होऊ शकतील एवढे ज्ञानभांडार – गिरीश प्रभुणे

भटके-विमुक्तांकडे अनेक उपनिषदे होऊ शकतील एवढे ज्ञानभांडार – गिरीश प्रभुणे

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

तळेगाव दाभाडे :- “भटके-विमुक्त समाज हा भारतातील अनुभवसिद्ध ज्ञानाचे भांडार आहे. त्यांच्या जीवनशैलीत, श्रमात, भाषांमध्ये, परंपरांमध्ये उपनिषदासारखं सखोल ज्ञान आहे. प्रत्येक जातीचा इतिहास लिहिला तर ज्ञानाची शेकडो उपनिषदे लिहिता येतील,” असे ठाम मत ज्येष्ठ समाजसेवक आणि लेखक गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले.
तळेगाव दाभाडे येथील श्री गणेश मोफत वाचनालय व ग्रंथालय यांच्या वतीने आयोजित समारंभात प्रभुणे यांचा अमृतमहोत्सवी गौरव करण्यात आला. या वेळी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दिवेकर यांनी त्यांच्या प्रदीर्घ सामाजिक प्रवासाची प्रकट मुलाखत घेतली. संवादात प्रभुणे यांनी आपल्या कार्याचा आणि अनुभवाचा विस्तृत पट उलगडला. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे भंडारा डोंगर दशमी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, तळेगाव शहर संघचालक विक्रम दाभाडे ,सामाजिक समरसता मंचाचे डाॅ.सुनिल भंडगे तसेच वाचनालयाचे अध्यक्ष दिनेश कुलकर्णी उपस्थित होते.
असीधारा साप्ताहिकापासून ग्रामायनपर्यंत…
प्रभुणे यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, ‘असीधारा’ नावाचं सामाजिक साप्ताहिक सुरू केलं होतं. बदलत्या काळात आणि तंत्रज्ञानाच्या वेगाशी जुळवून न घेतल्यामुळे साप्ताहिक बंद करावं लागलं. त्या साप्ताहिकावर साडेतीन लाखांचं कर्ज झालं होतं – जे पुढे पत्नीने फेडलं.
यानंतर त्यांनी ‘माणूस’ मासिकात माजगावकरांसोबत काम सुरू केलं, अनेक विचारवंतांच्या मुलाखती घेतल्या. ‘ग्रामायन’ विशेषांकात त्यांनी १०० पानी लेखन एकहाती केलं. गावात वास्तव्यास राहून २५ वर्षांत एकही लग्न न झालेल्या गावातील अनुभव त्यांनी शब्दबद्ध केला. याच विशेषांकाच्या दोन आवृत्त्या निघाल्या आणि त्याचे इंग्रजी भाषांतर होऊन युनेस्कोपर्यंत पोहोचले. शरद जोशी, विजय तेंडुलकर, पु. ल. देशपांडे यांच्याशी प्रत्यक्ष सुसंवाद घडला. पुलंनी त्या लेखाचा “लेखक कोण?” म्हणून चौकशी करून थेट ५,००० रुपयांचं बक्षीस दिलं – हे त्यांनी विशेष आठवणीने सांगितलं.
संघाचा चष्मा बाजूला ठेवून माणूस पाहिला
“मी प्रचारक होतो, तुकाराम जाधव नावाचा कार्यकर्ता विस्तारक होता. जनावरांसाठी चारा, स्वयंपाकासाठी सरपण गोळा करून तो गावातील माणसांना शिकवायचा. त्यानं मला संघ शिकवला,” असं त्यांनी सांगितलं. “घाटकोपर, रमाबाई नगरच्या बौद्ध वस्तीतही सहा महिने राहिलो. ‘खेड्याकडे चला’ हे बरेचदा पटत नसे,” असेही ते म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र वाचून त्यांची भूमिका समजून घेतली. बुद्धवंदना घेऊन लोकांना बाबासाहेबांचे विचार समजावले. निमगाव म्हाळुंगीत १५ कुटुंबं परत आणली. सर्वांना बरोबर घेऊन ते गाव हिरवंगार केलं. अस्पृश्यतेची तीव्रता अनुभवली. “त्याकाळी या लोकांचा स्पर्शही अवघड होता, सावली जाईल तर अपवित्र समजली जायची,” असे त्यांनी सांगितले.
भटके-विमुक्तांच्या ‘प्रथम वसना’चा प्रवास
प्रभुणे यांनी सांगितलं की, त्यांनी फासेपारधी, नंदीबैलवाले, मरीआई पूजक, गोंधळी आदी समाजांसाठी १९९३ ते २००४ या काळात काम केलं. गुन्हेगारीचा शिक्का पुसण्यासाठी पोलीस स्टेशनचे हेलपाटे खावे लागले. लहान मुलं भुकेने हॉटेलमधून चोऱ्या करत. त्यांना वळण लावण्यासाठी शाखा सुरू केली. शाळेची गरज ओळखून एक वर्षाने ‘यमगरवाडी’ वसतिगृह सुरू केलं.
तुळजापूरजवळ जमीन मिळाली. भिकू इदाते, रमेश पतंगे यांच्या उपस्थितीत भटक्या-विमुक्तांचा मोठा मेळावा झाला. “किती जण येतील? १०-१५?” – असा प्रश्न होता; पण १५०० जण आले. वसतिगृहासाठी २५ मुलांची निवड करताना ‘जास्तीत जास्त अन्याय झालेली’ मुलं घेण्याचं धोरण ठरवलं. पहिल्याच दिवशी १०० मुले आली. ही मुलं दहा-दहा चपात्या खायची – इतकी उपाशी होती.
नव्या शिक्षणाची समरसता
प्रभुणे यांचा प्रवास यमगरवाडीपासून “समरसता गुरुकुलम्” या सामाजिक शिक्षण प्रकल्पापर्यंत पोहोचतो. पारंपरिक ज्ञान, स्थानिक भाषांची ओळख, वडार समाजाच्या छन्नी-हातोड्याचे कौशल्य, घिसाडी-ओतारी कलेचे इंजिनिअरिंगमध्ये रूपांतर, यावर आधारित संशोधक समाज घडवण्याचे त्यांचे ध्येय आहे. “मायक्रोसॉफ्ट मन” म्हणजे सूक्ष्म व संवेदनशील विचारांची खिडकी उघडणं – हे त्यांनी शिकवलं. कानडी, तेलुगू, वाघरी, भिल्ल भाषांमधून पारंपरिक ज्ञान जपणारा हा समाज ‘ज्ञानसम्राट’ आहे, असे प्रभुणे ठामपणे सांगतात.
मेकॉले शिक्षण पद्धतीचा विरोध
“उच्चवर्णीय शिक्षणात टिकतात, पण मागासवर्गातले नाहीत. मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीने भटक्या-विमुक्तांमधली सरस्वती हरवली आहे. त्यांच्याजवळ आपण पोचलं पाहिजे. त्यांचं ज्ञान अनुभवावं लागेल,” असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं.
धनगर समाजाचं उदाहरण देत त्यांनी सांगितलं की, “लोकर काढून वस्त्र बनवण्याचं कौशल्य असणारी ही जमात आज विस्मरणात गेली आहे. त्यांनी लावलेले असंख्य शोध, तांत्रिक कौशल्य, जगण्याचं तत्त्वज्ञान – हे सर्व पुन्हा शोधलं पाहिजे. भटक्या-विमुक्तांचा भारत हे ज्ञानाचं खजिनं आहे.”
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री गणेश वाचनालयाचे अध्यक्ष दिनेश गंगाधर कुलकर्णी, चिटणीस प्रीतम भेगडे आणि ग्रंथपाल विनया अत्रे ,कार्यक्रम प्रमुख यतीन शहा तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या शिक्षक, अभ्यासक, कार्यकर्त्यांनी प्रभुणेंच्या अनुभवातून प्रेरणा घेतली. “बैठका जास्त झाल्या की कंटाळा येतो,” असं सांगणाऱ्या या थेट माणसाशी भिडणाऱ्या समाजसेवकाने “प्रथम वसन करा, मग पुनर्वसन” ही भूमिका जगून दाखवली आहे. संस्थेचे अध्यक्ष दिनेश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय हर्षल गुजर यांनी करून दिला. अविनाश राऊत यांनी आभार मानले.

Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00