मुंबई (दि. ०९ डिसेंबर २०२५) :- अबकड समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आणि राज्य सरकारने आरक्षणाबाबत तातडीने निर्णय घ्यावा, यासाठी आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन करण्यात आले. युवा आमदार अमित गोरखे आणि आमदार जितेश अंतापूरकर यांनी वेगळा पोशाख परिधान करून या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले.
आंदोलनात आमदार कृपाल तुमाने आणि आमदार काळे यांनीही सहभाग नोंदवला. अबकड समाजातील ५९ जातींच्या वंचित घटकांना न्याय मिळावा, आरक्षणाची अंमलबजावणी विलंब न लावता तात्काळ व्हावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी लक्ष वेधत सांगितले की, राज्यातील अनेक वंचित घटकांना शिक्षण, नोकरी आणि सामाजिक न्यायाच्या संधींपासून वंचित राहावे लागत आहे. सरकारकडून वारंवार आश्वासने दिली जात असली तरी प्रत्यक्ष निर्णय होत नसल्याने समाजात रोष वाढत आहे. त्यामुळे आरक्षणाची अंमलबजावणी हा केवळ धोरणात्मक मुद्दा नसून, वंचितांच्या भविष्याशी निगडित जीवन-मरणाचा प्रश्न बनला आहे, असे मत आमदारांनी व्यक्त केले.
नेत्यांनी या लढ्याला पुढे आणखी तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला असून, अबकड समाजाच्या हक्कांसाठीचा संघर्ष पुढील काळात अधिक व्यापक होणार असल्याचे संकेत दिले.
