पिंपरी-चिंचवड, महाराष्ट्र: पवना नदीच्या काठावर राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी एक महत्त्वाची सूचना. सद्यस्थितीत पवना धरण ७५.६९% भरलेलं आहे. पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी, सध्या सांडव्याद्वारे नदीपात्रात नियंत्रित पद्धतीने ८०० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे.
विसर्ग वाढवण्याची शक्यता
आज दुपारी २:३० वाजल्यापासून पाणलोट क्षेत्रातील पाण्याच्या आवकनुसार, सांडव्यावरील विसर्ग वाढवून एकूण १६०० क्युसेक्स इतका केला जाईल. पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या प्रमाणानुसार आणि येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग कमी-जास्त होण्याची शक्यता आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
- कृपया कोणीही नदीपात्रात उतरू नये.
- नदीमधील पाण्याचे पंप, नदीकाठची शेती अवजारे आणि इतर तत्सम साहित्य, तसेच जनावरे असल्यास, ती तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावीत.
- सखल भागातील संबंधित नागरिकांनाही या सूचना देण्यात याव्यात.
जलसंपदा विभाग आणि प्रशासनास सर्वांनी योग्य ती खबरदारी आणि दक्षता घेऊन सहकार्य करावं, असं आवाहन करण्यात येत आहे.
