पिंपरी (दि.०९ डिसेंबर २०२५):- पिंपरी चिंचवडमध्ये महापालिका निवडणुकीची अधिकृत घोषणा बाकी असली, तरी शहरातील राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. प्रत्येक प्रभागात ‘मीच उमेदवार’ अशी डिजिटल हूल उठली असून, सोशल मीडिया मोहीमा, बॅनर–होर्डिंग्ज आणि आकर्षक कटआऊटच्या जोरावर अनेकांनी वातावरण तापवले आहे. मात्र हे सगळे गाजावाजे वास्तवापासून दूर असल्याचे अनुभवी नेत्यांचे मत आहे.
प्रभागांत फिरणाऱ्या नागरिकांचे म्हणणे वेगळेच समीकरण उभे करते “फेसबुकवर दिसणारे चेहरे रस्त्यावर कुठे दिसत नाहीत.” डिजिटल लोकप्रियता आणि प्रत्यक्ष नेतृत्व कौशल्य यात अफाट अंतर असल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून सातत्याने केला जात आहे.
डिजिटल उमेदवारांची लाट, पण पायाभूत कामाचा अभाव…
शहरातील जवळपास प्रत्येक चौकात उमेदवारीच्या बॅनरचा अक्षरशः महापूर आला आहे. अनेक जण स्वतःला “भावी नगरसेवक” घोषित करत फिरत आहेत. परंतु प्रभागातील मूळ प्रश्न—पाणी, रस्ते, ड्रेनेज, नागरिकांची रोजची अडचण—यांकडे किमान लक्ष देण्याची तयारीसुद्धा काही इच्छुकांमध्ये दिसत नाही, अशी टीका जनतेतून होत आहे. पक्षांच्या संघटनांनीही अनेक डिजिटल उमेदवारांकडे पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांचे जाळे नाही, तर ‘फॉलोअर्स’चेच भांडवल असल्याचे सांगितले आहे. डिजिटल चमक पोकळ ठरू शकते, हे पक्षनेते आता मान्य करत आहेत.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वास्तवाचा धक्का?..
सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षांनी केलेल्या आंतरिक सर्वेक्षणांत अनेक ‘डिजिटल स्टार्स’चे नाव नकारात्मक यादीत गेल्याचे दिसले आहे. सोशल मीडियावरील प्रसिद्धीच्या जोरावर जे उमेदवारी गाजवत आहेत त्या पैकी मोठ्या संख्येने इच्छुकांची नावे प्रत्यक्ष यादीतून बाद होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यातच काही माजी नगरसेवकांनी पक्षातर करताना मिळवलेली “उमेदवारीची हमी” आता पक्षांसाठी डोकेदुखी बनली आहे. स्वतःची ‘लाट’ असल्याच्या भ्रमात असलेल्या या माजी लोकप्रतिनिधींना जनता यावेळी जाब विचारेल, अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे.
नेतृत्व शोधण्यात पक्षांची ‘परीक्षा’..
गटबाजी, वरच्या पातळीवरील दबाव आणि स्थानिक नेतृत्वातील मतभेद यामुळे योग्य उमेदवार निवडणे हे पक्षांपुढील मोठे आव्हान बनत आहे. तळागाळात काम करणाऱ्यांना संधी मिळावी असा पक्षनेत्यांचा बाह्य संदेश असला, तरी प्रत्यक्षात डिजिटल प्रभाव निर्माण करणाऱ्यांनाच प्राधान्य दिले जाते, अशी खंत जुन्या कार्यकर्त्यांतून व्यक्त होते. पिंपरी–चिंचवडमध्ये निवडणूक प्रचार हा चमकदार झालेला असला तरी प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी नागरिकांची मते ‘प्रत्यक्ष कार्यावर’च ठरणार आहेत, असा अंदाज राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
