पिंपरी-चिंचवड :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत ७० पेक्षा अधिक चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या तसेच पोलिस पथकावर फायरिंग करून खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील मुख्य फरार आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.
दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १३ मे २०२६ रोजी झालेल्या फायरिंग आणि खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी शेखर संभाजी जाधव व त्याचे साथीदार गुन्हा घडल्यानंतर फरार झाले होते. या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
तपासादरम्यान १६ मे २०२६ रोजी आरोपी शेखर जाधव व त्याचा साथीदार मुस्तफा उर्फ भाईजान हे रांजणगाव परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांना पकडण्यासाठी गेलेल्या गुन्हे शाखेच्या पथकावर आरोपींनी फायरिंग करून उसाच्या शेतातून पळ काढला होता. या घटनेप्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यातही स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार गणेश सावंत व विनोद वीर यांनी सातत्याने तपास केला. आरोपीच्या शोधासाठी नांदेड, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांत तीन वेळा जाऊन गोपनीय माहिती संकलित करण्यात आली. तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले.
अखेर मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते यांच्या नेतृत्वाखालील पथकाने १४ जून २०२६ रोजी सायंकाळी मोझे शाळेजवळील मोकळ्या मैदानातून शेखर संभाजी जाधव (वय २५, रा. मोघा, ता. उदगीर, जि. लातूर) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून अंदाजे ५१ हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी त्याला दिघी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
