पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट-१ पथकाने धाडसी आणि कौशल्यपूर्ण कारवाई करत महिलांच्या व नागरिकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या सराईत चैन स्नॅचरला फिल्मी स्टाईल पाठलाग करून अटक केली. या कारवाईत पाच चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून सुमारे १५ लाख रुपयांचे ७६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दोन स्पोर्ट्स बाईक जप्त करण्यात आल्या आहेत.
सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३ जून २०२६ रोजी विशालनगर येथील सुदर्शन पॅराडाईजसमोर एका नागरिकाच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची चैन अज्ञात चोरट्याने स्पोर्ट्स बाईकवर येऊन हिसकावून नेली होती. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गंभीर गुन्ह्याची दखल घेत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुन्हे शाखेला आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याचे निर्देश दिले होते.
सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-१चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी विशेष पथके तयार करून तपास सुरू केला. तपासादरम्यान पथकाने विविध भागांतील अंदाजे १५० ते २०० सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी केली. त्यामध्ये आरोपीने तळेगाव दाभाडे, देहूरोड, दापोडी आदी भागांतही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. तसेच आरोपी बेंगळुरू महामार्गाचा वापर करून बाणेर परिसरात वारंवार फिरत असल्याचेही तपासात समोर आले.
त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने बाणेर परिसरात सलग दोन ते तीन दिवस सापळा रचला. ७ जून रोजी रात्री आरोपी चैन स्नॅचिंगच्या उद्देशाने परिसरात आला असता त्याला पोलिसांची चाहूल लागली आणि त्याने स्पोर्ट्स बाईकवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने प्रसंगावधान राखत त्याचा पाठलाग केला आणि थरारक कारवाई करत सुमित गोविंद इंगळे (वय ३१) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने विविध ठिकाणी केलेल्या चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांची कबुली दिली.
तपासात सांगवी, दापोडी, तळेगाव दाभाडे, देहूरोड आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण पाच गुन्हे उघडकीस आले. आरोपीकडून १५ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. गुन्हे शाखा युनिट-१चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, पोलीस उपनिरीक्षक कर्मराज गावडे, शिवानंद स्वामी, प्रमोद वेताळ, संतोष इंगळे, महिला पोलीस हवालदार उषा दळे, पोलीस हवालदार महादेव जावळे, देवा राऊत, शिवराम भोपे, अजय डगळे, सागर अवसरे, मारुती करचुंडे, विजय शेळकंदे तसेच पोलीस शिपाई संदेश देशमुख, विजय जानराव, तेजस भालचिम, सोहेल चिखलकर आणि केशव चेपटे यांनी ही उल्लेखनीय कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली.
