चाकण येथील तळेगाव चौक परिसरात रविवारी घडलेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कंटेनरच्या धडकेत महिला रस्त्यावर कोसळली आणि तिच्या पाय व कंबरेवरून कंटेनरचे चाक गेल्याने ती गंभीर जखमी झाली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. १४ जून) सकाळी साडेअकराच्या सुमारास तळेगाव चौक, चाकण येथे हा भीषण अपघात घडला. कंटेनर चालकाने वाहन डाव्या बाजूने नेत असताना महिलेला धडक दिली. धडकेनंतर महिला रस्त्यावर पडली आणि कंटेनरचे चाक तिच्या अंगावरून गेल्याने ती जागीच बेशुद्ध झाली.
अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमी महिलेला मदत करण्याचा प्रयत्न केला. अॅम्ब्युलन्स चालक साईनाथ माकणे आणि स्थानिक नागरिकांनी तिला त्वरित ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तिची प्रकृती अत्यंत गंभीर होती.
दरम्यान, घटनास्थळी जमलेल्या नातेवाईकांनी संबंधित महिलेची ओळख रोहिणी हिरासिंग दुरवेरा (रा. आंबेठाण, ता. खेड) अशी पटवून दिली. डॉक्टरांनी उपचार सुरू ठेवले, परंतु मृत्यूशी सुरू असलेली तिची झुंज अखेर अपयशी ठरली. सोमवारी (दि. १५ जून) पहाटे दीडच्या सुमारास डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
अपघातप्रकरणी कंटेनर चालक शंकर बळीराम जाधव (रा. रांजणगाव, ता. शिरूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उत्तर चाकण पोलीस करीत आहेत.
